Wednesday 24 August 2016

मग का करावी मी आत्महत्या ???

मग का करावी मी आत्महत्या ???
ग का करावी मी आत्महत्या ??? माझ्यासोबत माझ्यावर खूप सारं प्रेम करणारी माझी आई, कोणत्याही परिस्थितीत हातात हात घेऊन मी आहे बरोबर असं सांगणारे माझे बाबा,, माझे, मित्र, माझ्या मैत्रिणी आहेत… मग आणि काय हवं आहे मला..??? जे माझे कधी नव्हतेच त्याची का अपेक्षा मला? एवढा सुंदर निसर्ग सभोवती असताना आणखी कोणत्या सौन्दर्यात अडखळतोय मी? बिनधास्त मन मोकळं होऊ शकतं असे फ्रेंड सर्कल, मग आणखीन काय राहतं मनात जे शेअर करायला आणखीन कोणाची गरज पडते मला? कित्येक नियम, बंधने धाब्यावर बसवून बेधडक हुंदडत असतो, आणखीन कोणती मोकळीक हवी मला ?
“ ऐकावे जणांचे करावे मनाचे “...हेच सतत बिंबवलंय माझ्या मनावर, आता कितपत आणि कुठवर ऐकायचे मनाचे ? घरात कोंडतय मला, मोकळीक हवी, असे सांगणाऱ्या मनाचे ? तू विश्वास ठेऊनहि, ती धोका देते याचे पुरावे देणाऱ्या मनाचे ? तुझा सगळीच धिकारी करतात, तू का जगतो आहेस, संपव जीवन असे प्रोत्साहन देणाऱ्या मनाचे? नाही .... नाही ..... नाही ..... मी ऐकतो माझ्या बुद्धीचे, जी बुद्धी मला दाखवून देते जन्ममागचे रहस्य, ती सांगते मला… तुझी गरज आहे, तुझ्या आई बाबांना,तुझी गरज आहे तुझ्या मित्रांना, तुझी गरज आहे समाजाला, देशाला ... ती सांगते मला, हा निगेटिव्ह चष्मा उतरवून फेकून दे आणि निखळ वाहणाऱ्या तुझ्या मनात तुला आजवर न गवसलेले सुंदर विचारांचे खळ्खळ्णाऱ्या झऱ्यातील मोती... अगदी ओंजळीत घेऊन तुझ्याच दमलेल्या चेहऱ्यावर उधळून घे.... आणि मग बघ ... तुझ्यात दडलेला प्रकाशास कसा कवडसा मिळतो, तू तारा होशील काही क्षणार्धात ..., जो स्वतःबरोबर इतरांना देखील प्रकाशमान करेल ...जो जगण्यामागचा हेतू स्पष्ट करेल, विचार स्पष्ट करेल आणि शेवटी मनालाच भाग पडेल तुला सुचविण्यास कि, तुला जगायला हवं, ते सांगेल तुला, तुझी मलाही गरज आहे,तू जगलास तर आणि तरच मी जिवंत राहीन विचार करायला. मनाला तुमच्या जगण्याची ओढ लागेल आणि मग नकळत तुम्ही "स्व :" शी जोडला जाल, जे "स्व:" तुम्हाला जगण्यास प्रवृत्त करेल, सुंदर रंगीत विचारांच्या फुलांची तुमच्यावर उधळण करेल] आणि मग आत्महत्येस प्रवृत्त करणारे कुपोषित विचार आणि त्या विचारांना बळ देणारे मन आत्महत्या करेल. एक नवसंजीवनी मिळेल त्या मनाला, ज्यात जगण्याची उमेद असेल .....
मग का करावी मी आत्महत्या…???

No comments:

Post a Comment